
राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे यांची चौकशीची मागणी; ६ ऑगस्टला विशेष बैठकीचे आयोजन
सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सोलापूर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेत अनियमितता, निधीचा दुरुपयोग आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद बाबूराव चंदनशिवे यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करत चंदनशिवे यांनी सांगितले की, भुयारी गटार योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी मोठा हिस्सा रस्त्यांच्या कामांसाठी वळविण्यात आला आहे. तसेच मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार कामे न करता अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा दावा त्यांनी केला.
चंदनशिवे यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे ३४३.७५ कोटी रुपयांचा कार्यादेश देण्यात आला असून, एकूण २०७ किलोमीटर लांबीच्या कामापैकी सुमारे १४० किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. मात्र, काम करताना नियम आणि करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ज्योती नगर, बॉम्बे पार्क, जुळे सोलापूर, सैफुल, बाळे, शेळगी, केगाव आणि सोरेगाव परिसरातील नागरिकांनीही कामाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्य लोकवस्तीतील ड्रेनेज लाईनची कामे प्राधान्याने न करता काही ठिकाणी विकासकांच्या फायद्यासाठी रस्त्यांची कामे करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची तक्रार विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या विषयावर ६ ऑगस्ट २०२६ रोजी विधान भवन, मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा योजनेच्या अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड