
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील शाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करण्यासाठी ३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील ८ हजार ५३४ शाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे ३ लाख २४ हजार २७ विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण अद्याप प्रलंबित आहे. या मोहिमेअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण शाळांमध्येच करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण बाकी आहे, त्यांच्या पालकांना शाळांनी पूर्वसूचना देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी, असे आवाहन आधार समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे यांनी केले आहे.
प्रशासनाने पालकांना या विशेष मोहिमेला सहकार्य करून विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण वेळेत पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु