नाशिक - उद्योजकांच्या समस्यांवर आयमाचा ‘सेक्टर वॉक’ उपक्रम
मूलभूत सुविधांच्या उणिवा दूर करण्यासाठी थेट कृती नाशिक, 05 ऑगस्ट (हिं.स.) : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या केवळ कागदोपत्री न राहता त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेऊन तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफ
AIMA's 'Sector Walk' initiative


मूलभूत सुविधांच्या उणिवा दूर करण्यासाठी थेट कृती

नाशिक, 05 ऑगस्ट (हिं.स.) : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या केवळ कागदोपत्री न राहता त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेऊन तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ने ‘सेक्टर वॉक’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. उद्योगविश्वातील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

पाहणीदरम्यान सेक्टरमधील पथदीप व्यवस्था, घंटागाडी सेवा, रस्त्यांचे डांबरीकरण यांसह विविध मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या अनेक तक्रारींची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.या ‘सेक्टर वॉक’मध्ये आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, मूलभूत सेवा समितीचे चेअरमन नागेश पिंगळे, स्थानिक उद्योजक निशिकांत अहिरे, महानगरपालिकेच्या घंटागाडी विभागाचे प्रमुख अजय कागदे, पथदीप विभागाचे रवी सोनार आणि राजू दोंदे उपस्थित होते.

उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ मागण्या न करता प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देणारा ‘सेक्टर वॉक’ उपक्रम अंबड औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच उद्योगविश्व आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारा प्रभावी दुवा म्हणून हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

चौकट

संकल्पना प्रत्यक्षात साकारली

आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी पदभार स्वीकारताना मांडलेली ‘सेक्टर वॉक’ ही संकल्पना आता प्रत्यक्षात साकार झाली असून, या उपक्रमाचा शुभारंभ एक्सलो पॉइंटलगतच्या सेक्टर डी-१ मधून करण्यात आला. यावेळी संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande