
यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.)। खाणबाधित भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असल्याने अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. या गंभीर प्रश्नावर आमदार संजय देरकर व भाजपा नेते विजय पिदुरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत वणी, मारेगाव व झरी-जामणी तालुक्यांसाठी 140 शिक्षक स्वयंसेवकांच्या नियुक्तीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत दहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर या शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार वणी तालुक्यासाठी 47, मारेगावसाठी 41 व झरी-जामणी तालुक्यासाठी 52 शिक्षक स्वयंसेवक मंजूर करण्यात आले आहेत.
खाणबाधित परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी आ. संजय देरकर यांनी सातत्याने शासनाकडे लावून धरली होती. यासाठी त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलनही केले होते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर शासनाने शिक्षक स्वयंसेवक नियुक्तीचा निर्णय घेतल्याने या मागणीला यश मिळाल्याचे मानले जात आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी