
बीड, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 चे पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंत्री मंडळ बैठकीत मान्यता देणे बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार सोळंके म्हणाले की, मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत जायकवाडी प्रकल्पाचा 132 कि.मी. लांबीचा पैठण उजवा कालवा, गोदावरी नदीची उपनदी सिंदफणा नदीवर 453.64 दलघमी क्षमतेचे माजलगाव धरण व माजलगाव धरणाची उंची वाढविणे तसेच माजलगाव (लोणी सावंगी) उपसा योजना, प्रस्तावित साळींबा ठिबक उपसा योजना व 148 कि.मी. लांबीचा माजलगाव उजवा कालवा व त्यावरील गल्हाटी, उक्कडगाव, धोंड, मुरंबी, पेंडू व सुभाषनगर असे 06 मार्गस्थ जलाशय व मासोळी धरणाची उंची वाढविणे या प्रमुख घटकांचा समावेश असलेला महत्वकांक्षी मोठा सिंचन प्रकल्प आहे.
सदर प्रकल्पांतर्गत पैठण उजवा कालव्याद्वारे छ. संभाजीनगर (1,732 है.), अहिल्यानगर (1,690 हे.) व बीड (38,260 हे.) असे एकुण 41,682 है. व माजलगाव उजवा कालव्याद्वारे बीड (29, 105 हे.), परभणी (44,408 हे) व नांदेड (11,337 हे.) असे एकुण 84,850 है. व साळींबा ठिबक उपसा सिंचन योजनाद्वारे बीड (5,120 हे.) या पाच जिल्ह्यातील असे एकुण 1,31,652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे व 588.52 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्मिती होणार आहे.
जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 ची मंजुर सुधारित प्रशासकीय मान्यता रू. 2216.35 कोटीस सन 2009 मध्ये मान्यता प्राप्त आहे व प्रकल्पाची पंचम सुप्रमा छ. संभाजीनगर महामंडळ कार्यालय मार्फत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांचे कडे सादर करण्यात आलेली आहे व छाननी झालेली आहे. त्यानुसार प्रकल्पाची पंचम सुप्रमा किंमत रू. 6596.96 कोटी एवढी आहे. सदर प्रकल्पांतर्गत पैठण उजवा कालव्याद्वारे एकुण 41,682 हे. व माजलगाव उजवा कालव्याद्वारे एकुण 84,850 हे. व साळींबा ठिबक उपसा सिंचन योजना द्वारे (5, 120 है.) या पाच जिल्ह्यातील (छ. संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड परभणी व नांदेड) असे एकुण 1,31,652 हेक्टर सिंचन क्षेत्र असून यापैकी 96,404 हे. सिंचन क्षेत्र निर्मित झालेले आहे व 35,248 है. क्षेत्र परभणी व नांदेड जिल्ह्यातील उर्वरित आहे.
जायकवाडी टप्पा-2 प्रकल्पाचे पंचम सुप्रमास मान्यता दिल्यामुळे उर्वरित 35,248 हे. क्षेत्रास सिंचन निर्मिती व 92.315 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्मिती होणार आहे. त्यांतर्गत माझे मतदार संघातील माजलगाव धरणाची उंची वाढविणे व साळींबा ठिबक सिंचन योजना मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील भागासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी विशेष बाब म्हणुन शासनपत्र क्रं. संकीर्ण-2021/708/प्र.क्रं. 181 / मो.प्र.-2 दि. 31 2024 अन्वये जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 चा भाग म्हणुन तत्वतः मान्यता देण्यात आलेली असल्याने नव्याने समाविष्ठ करण्यात आली आहे. त्याचा समावेश पंचम सुप्रमा मध्ये करण्यात आला आहे, ज्याद्वारे वडवणी व धारूर तालुक्यातील (5,120 हे.) सिंचन क्षेत्र निर्मिती होणार आहे परंतु सदरील कामे पंचम सुप्रमास मान्यता मिळाल्यानंतरच करणे शक्य होणार आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या दि. 17/10/2025 रोजी झालेल्या नियामक समितीच्या मान्यता दिलेली असून प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.
जेणे करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचनास पाणी उपलब्ध होईल व उन्नती होईल तसेच सदरील कामांमुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर सिंचन सुविधा उपलब्ध होतील, ज्यांना कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल तसेच ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीस चालना मिळेल त्यामुळे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही याचा थेट लाभ होईल व एकुणच मराठवाड्यातील शाश्वत शेती व कृषी विकासाला उत्तेजना प्राप्त होईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis