
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाचे आगमण यंदा उशिरा झाल्यामुळे नागरिकांना नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची प्रतीक्षा होती. मात्र मागील आठवड्यात मेळघाटात चांगला पाऊस झाल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या आणि पोषक रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. झुटूलेची फुले, अंबाडीची भाजी, वाघाटे, कर्टुल्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता या रानभाज्या जंगलात, शेतजमिनीच्या कडेला, डोंगरदऱ्या, माळराने, ओढे-नाल्यांच्या काठावरील ओलसर भाग आणि नैसर्गिक परिसरात उगवतात. अशा रानभाज्या आरोग्याला पोषक असतात. पावसाळ्याच्या सुरवातीला ग्राहकांकडून रानभाज्यांना मोठी मागणी असते. मात्र यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्याने रानभाज्यांचे नैसर्गिक स्रोत विकसित झालेले नव्हते. परंतु, मागील आठवड्यात मेळघाटच्या विविध ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे रानभाज्या उगवत असून गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध प्रकारच्या भाज्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये फांजीची भाजी, वाघाटे, झुटूलची फुले, अंबाडीची भाजी, जिवतीची फुले, कर्टुले आदी रानभाज्या उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या रानभाज्या २० ते ४० व ५० रुपये गंजाप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांची पाहुले खरेदीसाठी बाजाराकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
या रानभाज्यांची किंमत इतर पालेभाज्यांपेक्षा जास्त असली तरी शरीरासाठी या भाज्या पौष्टिक असल्याने मोठी मागणी या रानभाज्यांना आहे या रानभाज्यांमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नसल्याने ग्राहकांचा कल या भाज्यांकडे जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. रानभाज्या ह्या जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, तंतुमय घटक आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांचा संतुलित आहारात समावेश केल्यास रोगप्रतीकारशक्ती वाढण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्ताक्षयासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. असे आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध वानखडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी