
बॉस्टन, 05 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्याच्या गव्हर्नर मौरा हीली यांनी 15 ऑगस्ट हा ‘भारत दिन’ (इंडिया डे) म्हणून घोषित केला आहे. राज्यातील भारतीय समुदायाने विविध क्षेत्रांत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील नागरिकांनी हा दिवस उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या 1 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेत भारतीय समुदायातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही गौरव करण्यात आला आहे. या संस्था दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून समाजातील ऐक्य वाढवतात, विविध संस्कृतींमध्ये संवाद घडवून आणतात आणि परस्पर समज अधिक दृढ करतात, असे गव्हर्नर यांनी नमूद केले.गव्हर्नर कार्यालयाच्या घोषणेनुसार, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्यप्राप्तीचा 79 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. 1947 मध्ये मिळालेले हे स्वातंत्र्य जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या उभारणीचा ऐतिहासिक टप्पा ठरल्याचेही घोषणेत म्हटले आहे.
घोषणेत भारताच्या जागतिक प्रवासी समुदायाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जगभरात भारतीय वंशाचे 3.6 कोटींहून अधिक लोक वास्तव्यास असून, त्यापैकी अमेरिकेत 50 लाखांहून अधिक भारतीय वंशाचे नागरिक राहतात. हे नागरिक अमेरिकेच्या सामाजिक, आर्थिक आणि नागरी जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घोषणेत भारताचे वर्णन विविधतेने नटलेल्या प्राचीन सभ्यतेच्या देश म्हणून करण्यात आले आहे. विविध जाती, धर्म, भाषा, परंपरा, संस्कृती, पोशाख, खाद्यसंस्कृती, हवामान आणि नैसर्गिक संपत्तीची अफाट विविधता असूनही भारतात राष्ट्रीय एकात्मतेची भावना कायम असल्याचे त्यात म्हटले आहे.
तसेच, मॅसॅच्युसेट्समधील भारतीय-अमेरिकन समुदायाने वैद्यकीय, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग-व्यवसाय आणि सार्वजनिक सेवेसह अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देऊन राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला बळकटी दिल्याचेही घोषणेत नमूद करण्यात आले आहे.याशिवाय, संपूर्ण मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय-अमेरिकन समुदाय दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतो. या कार्यक्रमांद्वारे भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकशाही मूल्ये तसेच शांतता आणि प्रगतीप्रती असलेली भारताची दीर्घकालीन बांधिलकी यांचा गौरव केला जातो.
याच धर्तीवर बोस्टनच्या महापौर मिशेल वू यांनीही 15 ऑगस्ट हा ‘भारत दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यांनी बोस्टनमध्ये नव्या भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटनाचे स्वागत केले. तसेच सेलबोस्टन-250 कार्यक्रमानिमित्त बोस्टनला भेट देणाऱ्या भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या नौकेच्या आगमनाचाही गौरव केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode