
अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या आतील परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, रुग्णांसह आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी होत असून, तोपर्यंत ग्रामपंचायतीने मुरूम टाकून तात्पुरती सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सुमारे ८० हजार लोकसंख्येचा आरोग्य भार सांभाळणाऱ्या आयुष्यमान आरोग्य मंदिरात दररोज जवळपास ३०० रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) केली जाते. याशिवाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असते. या रुग्णांच्या देखभालीसाठी त्यांचे नातेवाईकही मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रात उपस्थित असतात.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था गावातील दानशूर व्यक्ती आणि आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने आहार समितीमार्फत मोफत केली जाते. मात्र, या भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नातेवाईकांना आरोग्य मंदिराच्या चिखलमय परिसरातून मार्ग काढावा लागत आहे.
गर्भवती माता आणि अपघातग्रस्त रुग्णांनाही अडचणी
दैनंदिन तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती माता, रात्री-अपरात्री प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला तसेच महामार्गावर अपघात झाल्यानंतर उपचारासाठी आणण्यात येणाऱ्या रुग्णांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरात खासदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय कार्यकाळ सुरू असल्याने ग्रामपंचायतीला निधी खर्च करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक ठिकाणी ये-जा सुलभ करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाने ग्रामपंचायतीला मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
पेव्हर ब्लॉक बसविण्याची गरज
पेव्हर ब्लॉक नसल्यामुळे परिसरात चिखल निर्माण होतो आणि काही दिवसांनी शेवाळ तयार होते. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना दिवसा तसेच रात्रीही तोल सांभाळत चिखलातून मार्ग काढावा लागतो.
“परिसरात पेव्हर ब्लॉक नसल्याने चिखल होतो आणि कालांतराने शेवाळ तयार होते. त्यामुळे रुग्णांना तसेच कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविल्यास ही अडचण कायमस्वरूपी दूर होऊ शकते,” असे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गोळे यांनी सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी