
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या वार्षिक निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत ॲड. संतोष पाटील यांनी ७४७ मते मिळवत विजय संपादन केला. या निवडणुकीत एकूण १ हजार ६८८ मतदारांपैकी १ हजार ४३८ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदान व मतमोजणीची प्रक्रिया मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बाबासाहेब जाधव आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडली.
निवडणुकीत उपाध्यक्ष (खुला गट) पदासाठी ॲड. परमानंद जवळकोटे यांना १ हजार २९ मते मिळाली, तर उपाध्यक्ष (महिला राखीव) पदावर ॲड. शर्मिला देशमुख या ८८४ मतांसह विजयी झाल्या. सचिवपदी ॲड. जयप्रकाश भंडारे (८०२ मते), सहसचिवपदी ॲड. प्रियंका गोरंटी (६८५ मते) आणि खजिनदारपदी ॲड. सिद्धाराम पाटील (एस. एम.) (५६२ मते) यांची निवड झाली. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदभार ग्रहण सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बार असोसिएशनच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड