मेळघाटातील वनविश्रामगृहे दुर्लक्षित अवस्थेत; पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शासकीय वनविश्रामगृहे सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचली असून, देखभाल आणि दुरुस्तीअभावी अनेक इमारती अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. मेळघाटातील बहुतांश विश्रामगृहे सुमारे ५० वर्षांपूर्वी बा
ब्रिटिशकालीन वारसा कोसळण्याच्या मार्गावर ! मेळघाट पर्यटनाला जीर्ण विश्रामगृहांमुळे ग्रहण


अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शासकीय वनविश्रामगृहे सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचली असून, देखभाल आणि दुरुस्तीअभावी अनेक इमारती अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. मेळघाटातील बहुतांश विश्रामगृहे सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून काही इमारती ब्रिटिशकालीन असल्याची माहिती आहे.

आवश्यक डागडुजी आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वनविश्रामगृहांची अवस्था खराब झाली आहे. काही ठिकाणी छत गळत असून, अनेक इमारतींच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मेळघाटातील खानापूर, बेलकुंड, ढाकणा, पोपटखेडा, रंगूबेली, कोळखास, सेमाडोह, हरीसाल, धुळघाट रेल्वे आणि वान येथील वनविश्रामगृहे नियोजनाच्या अभावामुळे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ही विश्रामगृहे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत नाहीत.

दरवर्षी देशभरातून वन्यजीव निरीक्षण, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गप्रेमी पर्यटक मेळघाटाला भेट देतात. मात्र जंगलाच्या सान्निध्यात सुरक्षित आणि दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविश्रामगृहे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र त्यांच्या सध्याच्या अवस्थेमुळे मेळघाटाची पर्यटन क्षमता पूर्णपणे वापरली जात नसल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या मेळघाटात आधुनिक सुविधांनी सुसज्ज तसेच पर्यावरणपूरक विश्रामगृहे उभारल्यास देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

खानापूर विश्रामगृह सुविधा

अभावी बंद

खानापूर येथील वनविश्रामगृहात सध्या पाणी आणि वीज व्यवस्था उपलब्ध नसल्याने ते पर्यटकांसाठी सुरू करता येत नाही. आवश्यक सुविधा उपलब्ध करून हे विश्रामगृह लवकरच सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ढाकणा मनोज चौधरी यांनी दिली.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande