
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। उन्हाळी सुट्टीत १५ मे ते १५ जून या कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण केलेल्या शिक्षकांचे मानधन अद्यापही प्रलंबित असून ते तातडीने अदा करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जनगणना कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे पाच हजार शिक्षकांनी शासनाच्या आदेशानुसार उन्हाळी सुट्टीतही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणनेची जबाबदारी पार पाडली. मात्र, काम पूर्ण होऊनही संबंधित शिक्षकांना अद्याप मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जनगणना कार्यासाठी प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षणाचे १,२०० रुपये आणि प्रत्यक्ष जनगणना कामाचे ९,००० रुपये, असे एकूण १० हजार २०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. मात्र, काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटूनही मानधन न मिळाल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांनी सांगितले की, शासनाने सोपविलेली जनगणनेची जबाबदारी शिक्षकांनी प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे जनगणना कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांचे प्रलंबित मानधन कोणताही विलंब न लावता तातडीने अदा करावे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड