
द्रपूर, ५ ऑगस्ट (हिं.स.) :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम – 2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. ‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार मतदार यादीत राहू नये’ या उद्दिष्टाने जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 17 लाख 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 17 लाख 97 हजार 655 मतदारांपैकी 5 ऑगस्ट 2026 पर्यंत 17 लाख 97 हजार 027 मतदारांना (99.97 टक्के) गणना प्रपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी राज्यातील मुदत 17 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविली असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगती
चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेसाठी एकूण 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता :
70-राजूरा, 72-बल्लारपूर,73-ब्रम्हपुरी आणि74-चिमूर मतदारसंघांमध्ये 100 टक्के काम पूर्ण झाले आहे.
75-वरोरा मतदारसंघात 99.81 टक्के काम पूर्ण झाले आहे.
71-चंद्रपूर मतदारसंघात 98.63 टक्के काम पूर्ण झाले आहे.
सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) घरोघरी भेटी : 30 जून ते 17 ऑगस्ट 2026
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना : 17 ऑगस्ट 2026
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी : 24 ऑगस्ट 2026
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026
नोटीस टप्पा व दावे-हरकती निकाली काढणे : 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026
अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी : 27 ऑक्टोबर 2026
नागरिक व राजकीय पक्षांना आवाहन
सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र अचूक भरून जमा केलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओकडे 17 ऑगस्ट 2026 पूर्वी ते जमा करावे.
जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव