सोलापूर मनपाकडून दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारताच श्रद्धा पवार यांनी दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता २ हज
gfd


सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारताच श्रद्धा पवार यांनी दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता २ हजार रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला असून, या निर्णयाचा लाभ शहरातील २ हजार ८६२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना श्रद्धा पवार यांनी सांगितले की, वाढीव भत्त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ७१ लाख ५५ हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर दिव्यांगांना आर्थिक दिलासा देण्यास प्राधान्य देत प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महानगरपालिकेच्या ठरावानुसार ४० ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. दिव्यांग संस्था आणि संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत भत्त्यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे श्रद्धा पवार यांनी स्पष्ट केले.शहरातील लाभार्थ्यांमध्ये अस्थिव्यंग १,४८९, कर्णबधिर २९०, मूकबधिर १२१, मतिमंद ५८८ आणि इतर ३७४ अशा एकूण २,८६२ दिव्यांगांचा समावेश आहे.

दरम्यान, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेने दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के दिव्यांग निधीतून ३ कोटी १० लाख रुपये तरतूद केली असून, मागील वर्षातील ३ लाख ४४ हजार १४८ रुपये शिल्लक निधी पुढे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याणासाठी एकूण ३ कोटी १३ लाख ४४ हजार १४८ रुपये निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून उदरनिर्वाह भत्त्यासाठी २ कोटी ८६ लाख २० हजार रुपये, दिव्यांगांना मालमत्ता करात ५० टक्के सवलतीसाठी १० लाख रुपये, मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी १० लाख २४ हजार १४८ रुपये, तसेच फिजिओथेरपी केंद्रासाठी मनुष्यबळ आणि साहित्य खरेदीसाठी ७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे श्रद्धा पवार यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande