
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सदिच्छा भेट घेऊन बीड जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी केज शहरातील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग NH-548D वर शहराच्या दक्षिण बाजूस वळण रस्ता (बायपास) उभारण्याची मागणी केली. तसेच बीड जिल्ह्यातील अपूर्ण, संथ गतीने सुरू असलेले व निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणांवर आवश्यक ती कार्यवाही करावी आणि सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशीही मागणी केली.
यावेळी नितीन गडकरी यांनी दोन्ही मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती चौकशी करून प्रस्तावांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, तसेच या कामांबाबत प्राधान्याने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.बीड जिल्ह्यातील रस्ते विकासाची सर्व कामे दर्जेदार, वेळेत आणि लोकहित लक्षात घेऊन पूर्ण व्हावीत, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही कायम राहील. असे खा. बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis