बीड -अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश आमदार प्रकाश सोळंके यांनी दिले आहेत. स्मारक बचाव संघर्ष समितीने मांडलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक व आदरपूर्वक विचार करून त्याबाबत संबंधित विभागांची संय
अ


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश आमदार प्रकाश सोळंके यांनी दिले आहेत.

स्मारक बचाव संघर्ष समितीने मांडलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक व आदरपूर्वक विचार करून त्याबाबत संबंधित विभागांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व संबंधित विभागांना विहित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या स्पष्ट व कडक सूचना देण्यात आल्या.

यावेळी माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते मौलाना आझाद चौक तसेच बायपास मार्गावरील अतिक्रमणे येत्या गुरुवारपासून हटविण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिक्रमणधारकांना वीजपुरवठ्यासाठी देण्यात आलेले अनधिकृत वीज मीटर एका दिवसाच्या आत काढून घेण्याची कार्यवाही महावितरणने करावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरातील ट्रान्सफॉर्मर अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी महावितरणने तातडीने अंदाजपत्रक तयार करावे. या कामासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल.

याशिवाय, माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर ही नावे पुढील आठ दिवसांत अद्ययावत करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.

गुरुवारी सकाळपासून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही नियोजनबद्ध व प्रभावीपणे सुरू होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घेऊन समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande