


रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। : देशाची अन्नसुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे, संचालक विजय लेले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे देश आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आगामी काळात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी सक्षम, संपन्न आणि समाधानी असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पुस्तके आणि डिजिटल माध्यमांमधून ज्ञान मिळते, मात्र प्रत्यक्ष शेतातील अनुभव विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समृद्ध करतो. त्यामुळे कृषी अभ्यास सहलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. दौऱ्यादरम्यान ॲड. नार्वेकर यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग घेतला. तसेच प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्र आणि यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून संशोधन कार्याची माहिती घेतली.
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी संशोधनाचा लाभ मिळावा आणि कृषी विद्यापीठांच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)