
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरमधील बी-२ प्रश्न निकाली काढल्याबद्दल सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सोलापूरची ओळख असलेल्या विशेष सोलापुरी चादरीद्वारे सत्कार करण्यात आला. या शिष्टमंडळात नगरसेवक विनोद भोसले, मंडल अध्यक्ष नागेश खरात आणि शाहू सलगर यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या सोलापुरी चादरीवर विणकामातून त्यांचे प्रतिबिंब साकारण्यात आले होते. तसेच त्यांनी घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांचे प्रतीकात्मक चित्रणही या चादरीवर करण्यात आले होते.
चादरीचे वैशिष्ट्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत शिष्टमंडळाचे कौतुक केले. सोलापूरच्या पारंपरिक विणकाम कलेचा अनोखा नमुना आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक केल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड