
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. अंबिका अनिल डहाळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अंबिका डहाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभास मनपा सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, नगरसेवक शाम खोबे, बबलू घागरमाळे, विकास राजापुरे, प्रा. राजेश रणखांबे, अर्जुन गुजर, सलीम तांबोळी, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. अंबिका डहाळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis