
रायगड, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। : केंद्र शासनाने खोल समुद्रातील मासेमारीस परवानगी दिली असली, तरी राज्य शासनाने प्रादेशिक जलक्षेत्रातील मासेमारीवरील निर्बंध १५ ऑगस्टपर्यंत कायम ठेवले आहेत. त्यामुळे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या हद्दीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करता येत नसल्याने अनेक मच्छीमारांना बंदी उठूनही प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करता आलेला नाही.
खोल समुद्रातील मासेमारीवरील ६१ दिवसांची वार्षिक बंदी १ ऑगस्टपासून उठली असली, तरी रायगड किनारपट्टीवरील मच्छीमारांना अद्याप समुद्रात उतरणे शक्य झालेले नाही. समुद्रातील उंच लाटा, वेगवान वारे आणि सततचे प्रतिकूल हवामान यामुळे बहुतांश यांत्रिक नौका किनाऱ्यावरच थांबल्या आहेत. परिणामी नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात लांबली असून स्थानिक बाजारपेठांमध्ये ताज्या समुद्री मासळीचा तुटवडा कायम आहे.
यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाल्याने समुद्र दीर्घकाळ खवळलेल्या अवस्थेत आहे. खोल समुद्रात लाटांची उंची आणि वाऱ्याचा वेग अद्यापही अधिक असल्याने मासेमारी करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे.
नारळी पौर्णिमेनंतर नव्या मासेमारी हंगामाला प्रारंभ करण्याची किनारपट्टीवरील परंपरा असल्याने यंदा २८ ऑगस्टनंतर समुद्र अनुकूल झाल्यास मासेमारीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या मच्छीमार नौकांची दुरुस्ती, इंजिनांची तपासणी, जाळ्यांची डागडुजी, रंगरंगोटी आणि इंधनाची तयारी करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, मासेमारी सुरू न झाल्याने स्थानिक बाजारपेठेत ताज्या समुद्री मासळीचा पुरवठा अत्यल्प आहे. त्यामुळे ग्राहकांना गोठवलेल्या किंवा इतर जिल्ह्यांतून आणलेल्या मासळीवर समाधान मानावे लागत असून, मर्यादित पुरवठ्यामुळे काही प्रकारच्या मासळीचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
समुद्र अद्यापही खवळलेला आहे. अशा परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात उतरणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे हवामान अनुकूल होईपर्यंत प्रतीक्षा करणे हाच शहाणपणाचा निर्णय आहे.
— नागेश पेरेकर, मच्छीमार, आग्राव
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)