
आगामी ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून क्रांतीज्योत, अन्नत्याग आणि साखळी उपोषणाचा निर्धार
अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) : ग्रामगीता, राष्ट्रभक्ती, स्वच्छता, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी आता जनआंदोलन उभारण्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अद्याप ‘भारतरत्न’ न मिळणे ही शोकांतिका असल्याची भावना व्यक्त करत गुरुदेव भक्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तहसील कार्यालयासमोर ‘क्रांतीज्योत’ प्रज्वलित करून अन्नत्याग आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
गुरुदेव भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पूनसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, राष्ट्रसंतांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर योग्य सन्मान व्हावा, यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार
क्रांतीदिनाच्या दिवशी तिवसा तहसील कार्यालय परिसरात क्रांतीज्योत प्रज्वलित करून अन्नत्याग आंदोलनासह साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पूनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्त सहभागी होणार आहेत.
जोपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाबाबत जिल्हा आणि तालुका प्रशासनाला अधिकृत सूचना देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी