
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। होटगी मार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला महापालिकेने तात्पुरती स्थगिती दिली आहे. महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता शहर हद्दीत काम सुरू करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गटनेते नरेंद्र काळे यांनी याबाबत माहिती दिली.
महिला हॉस्पिटलपासून सुरू होणाऱ्या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एमएसआरडीसीने महापालिकेची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तसेच आवश्यक समन्वय न साधता महापालिका हद्दीत काम सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेकडून सूचना व पत्रव्यवहार करूनही संबंधित मक्तेदाराने काम सुरूच ठेवल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.
यामुळे मूलभूत सुविधा पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. चार ते पाच ठिकाणी क्रॉस ड्रेनेजची व्यवस्था करणे, अप्रोच रस्त्यांचे काम पूर्ण करणे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची खात्री झाल्यानंतरच काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.दरम्यान, संबंधित कामाचे मक्तेदार विशाल देशमुख यांनी या निर्णयाबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. महापालिकेतील बैठकीस मक्तेदारांकडून कोणीही उपस्थित नसल्याने या निर्णयाची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड