अमरावतीत फेरीवाल्यांसाठी ‘वन क्लिक बारकोड सिस्टीम’ लागू करण्याची तयारी
- एका क्लिकवर मिळणार विक्रेत्यांची संपूर्ण माहिती - वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, नागरिकांची सुरक्षा वाढवणे आणि फेरीवाल्यांची पारदर्शक ओळख निर्माण करण
आ.प्रवीण पोटे यांच्या सूचनेनुसार आता फेरीवाल्यांना मिळणार नवी ओळख


- एका क्लिकवर मिळणार विक्रेत्यांची संपूर्ण माहिती

- वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ

अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, नागरिकांची सुरक्षा वाढवणे आणि फेरीवाल्यांची पारदर्शक ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ‘वन क्लिक बारकोड सिस्टीम’ लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे अधिकृत फेरीवाल्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

शहरातील विविध भागांत हजारो हातगाडी चालक आणि स्ट्रीट फूड विक्रेते व्यवसाय करतात. मात्र, अनियोजित पद्धतीने होणाऱ्या व्यवसायामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळे निर्माण होतात तसेच अपघातांचा धोका वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून आमदारांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाने ही डिजिटल धोरण योजना तयार केली आहे.

या प्रणालीद्वारे शहरातील सर्व अधिकृत फेरीवाल्यांची डिजिटल नोंद तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या अवैध फेरीवाल्यांची ओळख पटवणे सोपे होणार असून, अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे.

या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी अमरावती महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

फेरीवाल्यांचा रोजगार सुरक्षित ठेवतानाच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अशी असणार ‘वन क्लिक बारकोड सिस्टीम’

प्रत्येक अधिकृत फेरीवाल्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, परवाना आणि इतर माहिती ऑनलाइन डेटाबेसमध्ये नोंदवली जाणार आहे.

प्रत्येक हातगाडी किंवा टपरीवर युनिक बारकोड स्टिकर लावण्यात येणार आहे.

नागरिक किंवा ग्राहक मोबाईलवरून बारकोड स्कॅन करून विक्रेत्याची अधिकृत माहिती तपासू शकतील.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या बाबतीत कच्च्या मालाचा दर्जा आणि संबंधित इतर माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रणालीमुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायाला अधिकृत ओळख मिळण्यासोबतच शहरातील नियोजन आणि सुरक्षेलाही मदत होणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande