
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । होमिओपॅथी पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिनसाठी तयार करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) राज्यव्यापी सेवाबंदी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला प्रतिसाद देत आयएमए रत्नागिरी शाखेनेही गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयएमएच्या निवेदनानुसार होमिओपॅथी पदवीधरांची नावे मॉडर्न मेडिसिनच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या निर्णयाला राज्यातील एमबीबीएस व पदव्युत्तर पदवीधर डॉक्टरांचा तीव्र विरोध आहे. याबाबतची भूमिका आणि आक्षेप अनेकवेळा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यात आले होते; मात्र शासनाने या भावना विचारात न घेता संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाबंदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्वसूचना देण्यात आली असून, जिल्ह्याच्या विविध भागांतून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ही माहिती प्रसारमाध्यमांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे आयएमए रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. निनाद नाफडे आणि सचिव डॉ. अनघा घाग यांनी कळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी