
छत्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। अंबड तालुक्यातील नागरिकांसाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि अथक प्रयत्नांतून नवीन राजमाता जिजाऊ ३ बसगाड्यांचे लोकार्पण संपन्न झाले असून ही बस आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. आमदार नारायण कुचे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आमदार कुचे म्हणाले की, अंबड तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित, आरामदायी, विश्वासार्ह आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक दर्जेदार प्रवास सुविधा मिळावी, या उद्देशाने मी सातत्याने शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करत होतो. त्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज यश मिळाले असून ही नवीन बस जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्याचा मनापासून आनंद आहे.
सार्वजनिक वाहतूक ही ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गाव आणि शहर यांना जोडणारी सक्षम परिवहन व्यवस्था शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ करते. या नव्या बसमुळे अंबड तालुक्यातील हजारो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास आहे.
ही बस उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अंबड तालुक्यातील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंबड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नाच्या समाधानासाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis