
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
साधु-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लातूरच्या पवित्र परिसरात वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि विचारांची मोठी देणगी लाभली आहे. समाजातील गुणवंत, यशवंत, सेवागौरव आणि आदर्श व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत मोठे आणि आदर्श कार्य आहे. गुणवंतांच्या पाठीवर योग्य वेळी कौतुकाची थाप देणे हे केवळ एक कौतुक नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या गुणांची सर्वांगीण प्रगती करणारी ऊर्जा ठरते. या कौतुकामुळे विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळेल आणि समाजात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना वाढीस लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील 'लातूर पॅटर्न' जसा जगभर प्रसिद्ध आहे, अगदी त्याच धर्तीवर लातूरच्या या 'गोसावी वुमन्स विंगचा पॅटर्न' संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला पाहिजे. जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात महिला अशा पद्धतीने प्रामाणिक, सक्षम आणि संघटित कार्य करतील, तेव्हा समाजाची प्रगती निश्चितच होणार यात शंका नाही, असे भावपूर्ण व दिशादर्शक विचार समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी व्यक्त केले.
दशनाम गोसावी समाज, लातूर आणि गोसावी वुमन्स विंग आणि भारती फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पंचसुत्री कार्यक्रमांतर्गत भव्य सत्कार सोहळ्याचे शानदार उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. स्थानिक भालचंद्र ब्लड बँक सभागृहात पार दिलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान परभणीचे श्री. स्वप्निल भैया भारती यांनी भूषवले.
उद्घाटक ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना, लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती यांच्या नि:स्वार्थी समाजकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, धर्मवीर भारती यांच्या माध्यमातून हे मोठे समाजकार्य आज आकारास आले असून ते अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या समाज प्रबोधनाच्या पवित्र कार्याला आणि प्रतिष्ठानच्या वाढीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली.
यानंतर मुख्य वक्ते ह.भ.प. श्री. अविनाशजी भारती महाराज यांनी आपल्या अमोघ व प्रबोधनपर वाणीतून गोसावी समाजाला अंतर्मुख व्हायला लावणारा अत्यंत परखड संदेश दिला. ते म्हणाले की, गोसावी समाजाने आता केवळ मागणाऱ्यांच्या यादीत न राहता, स्वतःला शिक्षण, उद्योग आणि उच्च संस्कारांच्या जोरावर इतके सक्षम करावे की समाजाने देणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले पाहिजे. स्त्रियांचा सन्मान आणि योग्य संस्कारांची जपणूक हीच कोणत्याही जागृत धर्म संस्कृतीची खरी विचारसरणी आहे. 'देश सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असून गोसावी समाजाची नाळ ही माऊली चाकरवाडीकरांशी जोडलेली आहे, ते वारकरी संप्रदायाचे सच्चे अनुयायी आहेत. कीर्तनकारांचा असा भव्य सोहळा लातूरमध्ये संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी नामदेव महाराजांच्या कार्याचाही विशेष गौरव केला. 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, गोसावी समाजात कीर्तनकार आणि योगी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेली आहे, जी गावोगावी जाऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे पवित्र कार्य अविरतपणे करत आहे. आता केवळ त्रिसूत्री आणि पंचसूत्रीवर बोलण्यापेक्षा सर्व गोसावी बांधवांनी स्वतःमधील मतभेद विसरून एकत्र येत 'एकसूत्री' होण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. आजच्या काळात आपल्या समाजाच्या मुलांना पूजा कशी करावी हे सांगायची वेळ येणे ही मोठी शोकांतिका असून मुलांना योग्य संस्कार देणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. आपण सरसकट कोणालाही गुरू मानतो या प्रवृत्तीवर जळजळीत प्रहार करत महाराज म्हणाले की, 'सर्वांचा गुरू म्हणजे गोसावी' या आपल्या मूळ संकल्पनेवर समाजाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे माझ्या समाजासाठी प्रामाणिक कार्य करत राहणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे. शेवटी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श देशकार्य डोळ्यांसमोर ठेवून धर्म म्हणजे पाखंड नव्हे, तर दुसऱ्या धर्माचा आणि व्यक्तीचा सन्मान करणे होय, हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती म्हणाले की, गोसावी समाज एकसंघ करण्यासाठी आपण सदैव बांधिल आहोत, अशी ठाम ग्वाही दिली. हा भव्य पंचसूत्री सोहोळा आयोजित करण्यामागचे मुख्य प्रयोजन स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, समाजातील घटकांचा यथोचित सन्मान करणे आणि युवा पिढीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व प्रगतीसाठी मोठे प्रोत्साहन मिळावे, हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. याच वेळी त्यांनी लातूरमध्ये कार्यरत असलेल्या महिला संघटन आणि गोसावी वुमन्स विंगच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत महिला शक्तीचे कौतुक केले. त्याचबरोबर दशनाम गोसावी समाजाचे व्यंकटेश पुरी यांनीही समाज बांधवांना दशनाम गोसावी समाज हा हिंदू धर्म प्रचारक, प्रसारक असल्याचे सांगून समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. आपला हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ गुरू म्हणून आपला सन्मान केला जातो, हे पावित्र्य आपण जपले पहिजे असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis