
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सहकार आणि साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वैशालीनगर (निवळी) येथील विलास सहकारी साखर कारखान्याची 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया (DSTA), पुणे' यांच्या 'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना-२०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. साखर उद्योगातील तांत्रिक गुणवत्ता, आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि शेतकरीहिताच्या उपक्रमांमुळे हा मानाचा सन्मान कारखान्याला मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षांतील ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, पाणी बचत, पाणी पुनर्वापर, ऊस विकास, हार्वेस्टरद्वारे ऊसतोड, शासनाचे कर वेळेत भरणे तसेच सभासद, शेतकरी आणि कामगारांची देणी वेळेत अदा करून एफआरपीपेक्षा अधिक दराने ऊसाला मोबदला देण्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा सखोल अभ्यास करून ही निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हा कारखान्याचा ३९ वा पुरस्कार ठरला आहे.
या पुरस्काराचे वितरण ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट येथे आयोजित ७१ व्या वार्षिक परिषद व 'साखर एक्सपो-२०२६' दरम्यान होणार आहे. हा पुरस्कार माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील व संचालक मंडळ स्वीकारणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर देशमुख यांनी हा सन्मान ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचे यश असल्याची भावना व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis