
यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
येथील ख्यातनाम विधीज्ञ अॅड. जीवन पाटील यांचा नातू अंगद तेजस पाटील याने 150 देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखून त्यांच्या राजधान्यांची नावे सर्वात वेगाने सांगण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे.
यवतमाळ मध्ये राहणाèया 4 वर्षे 11 महिने वयाच्या अंगदने फ्लॅश कार्ड्सच्या साहाय्याने 150 राष्ट्रीय ध्वज ओळखले आणि त्या प्रत्येक देशाचे नाव तसेच त्याची राजधानी अवघ्या 8 मिनिटे 20 सेकंदात सांगितली. ही कामगिरी 17 जून 2026 रोजी अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आली. अंगद हा अॅड. तेजस पाटील आणि अॅड. रोहिणी पाटील यांचा मुलगा आहे. हे दोघेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली करतात.
ही अंगदची पहिलीच असामान्य कामगिरी नाही. 3 वर्षे आणि 3 महिने वयाचा असताना त्याने 50 देशांचे ध्वज ओळखून त्यांच्या राजधान्यांची नावे सांगण्याचा विक्रम केला होता. लहान वयातच त्याची विलक्षण स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता यातून दिसून आली.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी