
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित ४० तासांचा मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम समारोप समारंभासह संपन्न झाला. नियोजन भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणात सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथील ४९ ज्येष्ठ विधिज्ञांनी यशस्वी सहभाग नोंदविला.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमसीपीसी, नवी दिल्लीचे वरिष्ठ प्रशिक्षक संजीव भालेराव होते. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा संभाव्य प्रशिक्षक न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे प्रमुख उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना संजीव भालेराव यांनी मध्यस्थीच्या माध्यमातून प्रलंबित वाद सामोपचाराने निकाली काढण्यास मोठी चालना मिळेल, असे सांगितले. प्रशिक्षित मध्यस्थ न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करण्याबरोबरच वाद तडजोडीने सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अमोलकुमार ए. देशपांडे यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेत सहभागी विधिज्ञांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस. शर्मा यांनी प्रशिक्षणार्थींना दिलेल्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी पोहोचवल्या.
प्रशिक्षणार्थींनी ४० तासांच्या प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकासासह व्यावसायिक कौशल्यांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. वकिली व्यवसायाबरोबरच प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून वाद सामंजस्याने सोडविणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
समारोपप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व ४९ विधिज्ञांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ प्रशिक्षक संजीव टी. भालेराव आणि अमोलकुमार ए. देशपांडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव अमोलकुमार ए. देशपांडे यांच्या देखरेखीखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस. ए. जी. नदाफ यांनी दिली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड