
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पुण्यात दोन दिवसीय 'एकपात्री महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील भरतमुनी रंगघन येथे होणाऱ्या या महोत्सवात एकपात्री अभिनय कलेच्या विविध पैलूंवर परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
'पात्र एक... पण मुखवटे अनेक!' या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचा उद्देश एकपात्री अभिनय कलेचा अभ्यास, संवर्धन आणि नवोदित कलाकारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. अभिनय, वाचिक अभिव्यक्ती, देहबोली, व्यक्तिरेखा उभारणी आणि भावविश्व यांसारख्या एकपात्री सादरीकरणातील महत्त्वाच्या पैलूंवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात मकरंद टिल्लू, प्रकाश पारखी, राहुल भालेराव, प्रचिती सुरु आणि शारदा मुंढे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रकाश पारखी, दीपक रेगे, अंजली कराडकर आणि चैताली माजगावकर यांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
या महोत्सवात एकपात्री अभिनयाची संकल्पना, रंगमंचावरील प्रभावी सादरीकरण, आवाजाचा वापर, अभिव्यक्तीची तंत्रे आणि व्यक्तिरेखा साकारण्याची कौशल्ये यांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नवोदित कलाकार, नाट्य विद्यार्थी, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींसाठी हा महोत्सव अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु