नाशिक - महापालिकेकडून ११,६०९ खड्डे बुजविले; चार दिवसांत आणखी २,५६८ दुरुस्त
नाशिक, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविली आहे. जून महिन्यापासून २९ जुलैपर्यंत ११,६०९ खड्डे बुजविण्यात आले असून, त्यानंतर अवघ्या चार दिवस
Municipal Corporation fills 11,609


नाशिक, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविली आहे. जून महिन्यापासून २९ जुलैपर्यंत ११,६०९ खड्डे बुजविण्यात आले असून, त्यानंतर अवघ्या चार दिवसांत (३० जुलै ते २ ऑगस्ट) आणखी २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असले, तरी नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीची मोहीम अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. प्रतिकूल हवामानातही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी शहरभर युद्धपातळीवर काम करत १ जून ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ११ हजार ६०९ खड्डे बुजविले आहेत. त्यानंतर केवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २ हजार ५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.

महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व सहा विभागांमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. मुख्य रस्ते, वाहतुकीची मोठी वर्दळ असलेले मार्ग तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत.

पावसामुळे रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन जीएसबी, मुरूम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या मिलिंग मटेरियलचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत. विशेषतः मिलिंग मटेरियलमुळे पावसाळ्यातील दुरुस्ती अधिक टिकाऊ व परिणामकारक ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, शहरातील विविध भागांत त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे.दरम्यान, पावसाचा जोर कायम असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे. हवामानानुसार आवश्यक तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

चौकट

१ जून ते २९ जुलै या कालावधीतील खड्डे दुरुस्ती

पंचवटी – ५,४८४

नाशिक रोड – २,०४९

सातपूर – १,८२०

पश्चिम – ८९८

नवीन नाशिक – ८५०

नाशिक पूर्व – ५०८

एकूण – ११,६०९

३० जुलै ते २ ऑगस्ट (चार दिवस) कालावधीतील दुरुस्ती

सातपूर – ८६९

पंचवटी – ४९६

पश्चिम – ३५४

नवीन नाशिक – ३१४

नाशिक रोड – ३१२

नाशिक पूर्व – २२३

एकूण – २,५६८

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande