
- स्थायी समितीची मंजुरी मिळूनही करारनामा रखडला
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत स्पष्टता नाही
अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :महापालिकेच्या विविध विभागांना कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी निवड झालेल्या संस्थेसोबत करारनामा करण्यास प्रशासनाकडून विलंब होत असल्याने महापालिकेत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थायी समितीने गेल्या आठवड्यात संबंधित संस्थेसोबत करारनामा करण्यास मंजुरी दिली असली तरी प्रशासनाकडून अद्याप पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या प्रकरणातील निविदाप्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आदेशाबाबत अधिकृत स्पष्टता नसल्याने महापालिकेत गोंधळाचे वातावरण आहे.
मनपा प्रशासनाने प्रशासकीय राजवटीत बाह्य स्रोतांमार्फत कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ पुरवठ्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली होती. यामध्ये एका संस्थेची निवड करण्यात आली होती. मात्र, प्रतिस्पर्धी संस्थेने या प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.
नागपूर खंडपीठाने महापालिकेची निविदाप्रक्रिया योग्य असल्याचा निर्णय दिल्यानंतर पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर स्थायी समितीने संबंधित संस्थेसोबत करारनामा करण्यासाठी प्रशासनाला मंजुरी दिली.
मात्र, स्थायी समितीच्या मंजुरीनंतर एक आठवडा उलटूनही करारनामा करण्यात न आल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रतिस्पर्धी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, सुनावणीनंतर मनपाच्या निविदाप्रक्रियेला पुढे नेण्यावर स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, या आदेशाची अधिकृत पुष्टी प्रशासन, स्थायी समिती सभापती किंवा इतर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली नाही. मनपाच्या विधी अधिकाऱ्यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झालेली नसल्याने याबाबत स्पष्ट माहिती देता येत नसल्याचे सांगितले आहे.
६१ कोटींची होती मनुष्यबळ पुरवठ्याची निविदा
महापालिकेने बाह्य यंत्रणेमार्फत ६२५ मनुष्यबळ पुरवठ्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीकरिता ६१ कोटी रुपयांची निविदा काढली होती. सध्या महापालिकेच्या विविध विभागांमध्ये ७९५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.
करारनामा रखडल्यामुळे मनुष्यबळ पुरवठ्याची पुढील प्रक्रिया आणि महापालिकेच्या विभागीय कामकाजावर होणाऱ्या परिणामांबाबत आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी