
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात निषेध आंदोलन केले. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्ता धनकवडे, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, ॲड. रूपाली पाटील ठोंबरे, अक्रुर कुदळे, हाजी फिरोज शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारासमोरही निदर्शने केली.
यावेळी सुनील टिंगरे म्हणाले, देशाला महिला नेतृत्वाची समृद्ध परंपरा लाभली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातही महाराष्ट्र आणि देशातील महिलांनी महत्त्वपूर्ण नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेले अवमानकारक वक्तव्य निषेधार्ह असून, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा तीव्र निषेध करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु