
सिन्नर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टचे पडसाद सिन्नरमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकार्यांनी महिला नेत्या आणि संवैधानिक पदावरील व्यक्तीबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे सांगितले. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक स्तरावर अशा प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारांना कायदेशीर उत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.
या आंदोलनात नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुभाष कुंभार, आरोग्य सभापती ललिता हांडे, शिक्षण व क्रीडा सभापती कांताताई जाधव, नगरसेवक अॅड. पंकज जाधव, शेखर गोळेसर, सुदर्शन नाईक, विलास जाधव, विजय वरंदळ, सुनील गवळी, दत्ता हांडे, हरी वरंदळ, किरण गोजरे, बाळासाहेब कामानकर, बापू गोजरे, रवींद्र मोगल, योगानंद गवळी, ज्ञानेश्वर उबाळे, अनिल गायकवाड, संजय नवसे, समर्थ उगले, सचिन मचकुले आणि ऋषी भोर यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या शेवटी संबंधित पोस्टचा निषेध नोंदवून अशा प्रकारच्या वक्तव्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV