सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याविरोधात नाशिकात राष्ट्रवादीचे आंदोलन
NCP's agitation against Congress, linking it to Sapkal's image
सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याविरोधात नाशिकात राष्ट्रवादीचे आंदोलन


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या प्रतिमेला मारले जोडे

नाशिक, 05 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखाचे पडसाद नाशिकात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावर करण्यात आलेल्या या उल्लेखामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून बुधवारी नाशिकातही आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे मोर्चा वळवला. एम. जी. रोडवर मोर्चा पोहोचताच पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली.

या आंदोलनात आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार सरोज आहिरे म्हणाल्या की, काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरलेले अपशब्द निषेधार्ह आहेत. राज्यातील महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असून, काँग्रेसने केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठेपणा दाखवत सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande