
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत लज्जास्पद आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नांदेडच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला!
आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथे भव्य निदर्शने करून काँग्रेस नेत्यांच्या या बेजबाबदार व महिलांचा अनादर करणाऱ्या वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवला.
महिला नेत्यांचा सन्मान हा महाराष्ट्राची संस्कृती आहे, तो जपलाच पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली पातळी सोडून महिला लोकप्रतिनिधींचा अपमान करणे तत्काळ थांबवावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis