
नाशिक, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
जागतिक दर्जाचे उत्पादन व निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योगांनी मागणी आधारित उत्पादन, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, नावीन्य, क्षमता विकास आणि जागतिक बाजारपेठेचा सखोल अभ्यास यावर भर द्यावा. ’लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उद्योग, शासन, वित्तीय संस्था आणि सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा प्रशासन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंबड एमआयडीसी येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये आयोजित ’निर्यात जनजागृती शिबिर व ई-कॉमर्स एक्स्पोर्ट समिट’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डीजीएफटीचे अतिरिक्त महासंचालक आर. के. मिश्रा, उपमहासंचालक अश्वीन गोलपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, केपीएमजीचे प्रीतम मोहन सिंग, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योजक आणि निर्यातदार उपस्थित होते.
उद्योगांनी उत्पादन क्षमतेसोबतच बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून उत्पादनाची दिशा निश्चित करावी. ’मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्थानिक कच्च्या मालाचा वापर, मूल्यवर्धन, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्रे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यावर भर देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
उद्योगांना आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे, व्यवसाय सुलभता आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक ड्राय पोर्टचा प्रभावी वापर करून निर्यात खर्च कमी करणे, दळणवळण सुविधा सक्षम करणे आणि जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ’बायर-सेलर मीट’ आयोजित करून उद्योजकांना नव्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV