
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर आणि कळंब शहरांसह परिसरातील २८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या अवघा १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याचे जून आणि जुलै हे दोन मुख्य महिने कोरडे गेल्यामुळे मांजरा धरणक्षेत्रात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात या धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाणीपुरवठा योजनांना मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मांजरा धरणाची पूर्ण क्षमता २२४.०९३ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणात केवळ ७५.९०५ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी अजूनही ८४ टक्के पाण्याची गरज आहे. गेल्या ४७ वर्षांच्या इतिहासात हे धरण केवळ १७ वेळाच पूर्ण भरले आहे. गेल्या दोन दशकांत या धरणावरून अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने हे धरण प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठीच आरक्षित राहिले आहे. परिणामी सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी अडचणीत आले आहेत. पावसाची मोठी नक्षत्रे संपल्यामुळे आता सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांच्या आशा केवळ परतीच्या पावसावरच टिकून आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis