
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
झालेल्या मुसळधार
पावसाने तालुक्यातील जलसाठ्याचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २१ जलप्रकल्पांपैकी १३ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, पाण्याअभावी निर्माण झालेली शेतकरी व पशुपालकांची चिंता दूर झाली आहे. जुलै महिन्याच्या बहुतांश कालावधीत पावसाने ओढ दिल्याने अनेक जलप्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आला होता. त्यामुळे खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, महिन्याच्या अखेरीस झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने परिस्थितीत आमूलाग्र बदलघडवून आणला. अवघ्या तीन दिवसांत २२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, ३१ जुलैअखेर हंगामातील एकूण पर्जन्यमान ६०५ मिलीमीटरपर्यंत पोहोचले आहे. या पावसामुळे नागझरी, लोणी आणि डोंगरगाव हे तीन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तसेच अंबाडी, पिंपळगाव (कि.), निचपूर, वरसांगवी, मांडवी, सिरपूर आणि सिंदगी (मो.) हे सात लघु प्रकल्पही तुडुंब भरले आहेत. याशिवाय निराळा, सिंदगी आणि लक्कडकोट हे तीन साठवण तलावही शंभर टक्के भरल्याने तालुक्यातील जलसाठ्यात वाढ झाली. या पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis