मानवतमध्ये सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 950 नागरिकांची आरोग्य तपासणी
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या आरोग्य अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये आयोजित सर्वरोग निदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबि
मानवतमध्ये सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 950 नागरिकांची आरोग्य तपासणी


परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या आरोग्य अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये आयोजित सर्वरोग निदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 950 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान उपनगराध्यक्ष अंकुश लाड यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य अभियानामागील संकल्पना, उद्दिष्टे आणि पुढील नियोजन याबाबत माहिती देत, विकासकामांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारीही प्राधान्याने पार पाडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिबिरात तपासणी झालेल्या पात्र रुग्णांना लवकरच मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णांचा प्रवास, निवास, भोजन, उपचार आणि शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च स्वतःच्या वतीने करण्यात येणार असून आर्थिक अडचणीमुळे कोणताही गरजू नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळावे यासाठी आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक बाजीराव हालनोर, नियामत खान, रहीम भाई, जमील भाई, अफसर भाई तसेच संजय राणा नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, कार्यकर्ते आणि सहकार्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande