
पुणे, 5 ऑगस्ट (हिं.स.) : फुले मंडईतील सुमारे 2,200 गाळेधारकांवर प्रस्तावित भाडेवाढीचा निर्णय पुनर्विचार करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक तथा विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे लेखी निवेदन सादर केले.
मानकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि गेल्या काही वर्षांतील प्रतिकूल परिस्थितीचा विचार करूनच भाडेवाढीबाबत निर्णय घ्यावा. करोनाकाळातील लॉकडाऊन, ग्राहकसंख्येतील घट तसेच मंडई परिसरातील मेट्रो प्रकल्पामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
अनेक व्यापारी अद्यापही या आर्थिक संकटातून पूर्णपणे सावरलेले नसताना त्यांच्यावर वाढीव भाड्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे योग्य ठरणार नाही, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासूर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गाळेधारकांच्या हिताचा विचार करून प्रस्तावित भाडेवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही केली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु