
प्रवासात शांतता भंग केल्यास ५०० ते १००० रु. दंड
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सध्या मध्य रेल्वेने समाज माध्यमांद्वारे वेगळीच जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बरेच प्रवासी हेडफोनशिवाय मोठ्याने गाणी ऐकतात, व्हिडिओ पाहतात, गेम खेळतात किंवा रेल्वेमध्ये स्पीकर चालू ठेवून फोनवर बोलतात. यामुळेइतर प्रवाशांना त्रास होतो. या वाईट सवयीला 'साऊंडकास्टिंग' म्हटले जाते. मध्य रेल्वेने प्रवाशांना रेल्वेत हेडफोन वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आकर्षक जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. एका जाहिरातीत 'पुष्पा झुकेका नहीं साला' या प्रसिद्ध चित्रपटातील संवादाचा वापर करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे जाहिरातीत ?'पुष्पा झुकेगा नहीं साला, लेकिन ट्रेन के अंदर इअरफोन जरूर पहनेगा' असे आवाहन एका जाहिरातीतून करण्यात आले आहे. 'समझदार बनिये, ट्रेन के अंदर इअरफोन लगाइए, सबकी यात्रा सुकून भरी बनाईए !' असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सऱ्या एका जाहिरातीत 'पब्लिक प्लेस है बॉस, ये ना आपका होम थिएटर नहीं..' असा इशारा देण्यात आला नाहे. 'थोडा आवाज कमी, थोडा सन्मान जास्त' अशा शब्दात प्रवाशांना मोबाईलचा आवाज कमी ठेवण्याचा, हळू आवाजात बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासात अनेक जण मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. काही लोक रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत राहतात. यामुळे इतर प्रवाशांची झोप बिघडते. याबाबत भारतीय रेल्वेने स्पष्ट नियंम केले आहेत. त्यानुसार कोणताही प्रवासी रेल्वेगाडीत मोठ्याने गाणी ऐकू शकत नाही किवा मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही. जर तुमच्या आजूबाजूच्या प्रवाशांना तुमच्यामुळे अस्वस्थ वाटत असेल किवा त्यांना त्रास होत असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल. विशेषतः रात्रीच्या वेळी हे नियम काटेकोरपणे लागू केले जातात.
काय कारवाई केली जाऊ शकते ?रेल्वे कायदा, १९८९ च्या नियमांनुसार रेल्वेगाडीमधील शांतता भंग करणे किवा इतरांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा परिस्थितीत रेल्वे पोलीस (आरपीएफ) प्रवाशाला इशारा देऊ शकतात, त्याच्यावर दंड आकारू शकतात, किवा आवश्यक असल्यास त्याला कोणत्याही स्थानकावर खाली उतरवू शकतात. वेगवेगळ्याप्रकरणांमध्ये दंड ५०० ते १००० रुपये किवा त्याहून अधिक असू शकतो. याचा उद्देश प्रवाशांना शिक्षा करणे नाही, तर प्रवासादरम्यान एकमेकांची काळजी घेण्यासाठी सर्वांना जागरूक करणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी