
सोलापूर, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत श्वानदंश प्रतिबंधक (रेबीज) लसीच्या उपलब्धतेचा मुद्दा मंगळवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये श्वानदंश झालेल्या रुग्णांना वेळेवर लस मिळत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करत आरोग्य विभागाला जाब विचारला.
यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका रेबीज लसीच्या व्हायलमधून पाच डोस दिले जातात. एकाच रुग्णाला लस दिल्यास उर्वरित डोस वाया जाण्याची शक्यता असल्याने पाच रुग्ण एकत्र आल्यावरच लसीकरण केले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.
या उत्तरावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, लस वाया गेली तरी चालेल; पण माणसाचा जीव वाचला पाहिजे. श्वानदंश झालेल्या कोणत्याही रुग्णाला लसीअभावी परत पाठवू नका, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यानंतर श्वानदंशग्रस्तांना तातडीने रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थायी समितीने आरोग्य विभागाला दिले.
बैठकीत जिल्हा परिषदेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांच्या साठवणुकीचाही प्रश्न उपस्थित झाला. शासकीय रुग्णालयाच्या औषध भांडारात जागेअभावी अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. आषाढी यात्रेसाठी सुमारे दहा कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली होती; मात्र ती साठविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
यावर जिल्हा परिषदेच्या मालकीची योग्य जागा निश्चित करून तेथे स्वतंत्र औषध भांडार उभारण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील स्थायी समिती बैठकीपर्यंत यासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, ग्रामीण आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, आपत्कालीन आरोग्य सेवा तसेच विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड