
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात
जुलै अखेरच्या तीन दिवसांत झालेल्या धुव्वांधार पावसाने अमरावती विभागातील दहा जणांचा बळी घेतला असून पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात झाले आहेत. विभागातील १०५ कुटुंबांना विस्थापित होण्याची वेळ आली. ३६ तालुक्यांतील १३४३ गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावाने मॉन्सून कमजोर पडला असून विखूरलेल्या स्वरूपात पाऊस येत आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी अखेरच्या तीन दिवसांत मात्र पावसाने जोरदार हजेरी लावत तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या पावसाचा विभागातील ३६ तालुक्यांतील १३४३ गावांना फटका बसला आहे. एक लाख ७३ हजार ६४ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस, तूर, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात झाले असून अनुक्रमे ८४ हजार ८७० व ५७ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानासोबतच या पावसाने दहा जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात एक, यवतमाळ चार व बुलडाण्यातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. आठ जणांचा मृत्यू पुरात वाहून गेल्याने झाला असून दोघांचा मृत्यू घराची भिंत पडल्याने झाला आहे.
जिल्हानिहाय नुकसान जिल्हा ः
हेक्टर क्षेत्र ः मृत व्यक्ती ः स्थलांतरित कुटुंब
अमरावती ः ५७, ६९८ १ १५
अकोला ः ४४०८ ० ६५
यवतमाळ ः २६०८८ ४ २५
बुलडाणा ः ८४, ८७० ५ ०
एकूण ः १, ७३, ०६४ १० १०५
------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी