
बीड, 5 ऑगस्ट (हिं.स.) : पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बंद करण्यात आलेला पूर्वसंमतीचा टॅब पुन्हा सुरू करून प्रलंबित पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात यावी, अशी मागणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
आमदार सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र, कृषी विभागाच्या पोर्टलवरील 2025-26 या वर्षाचा पूर्वसंमतीचा टॅब तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणास्तव बंद करण्यात आल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत.
सध्या पोर्टलवर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्ज व पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी 2025-26 चा बंद टॅब पुन्हा सुरू करून प्रलंबित अर्जांवर तातडीने पूर्वसंमती देण्यात यावी, अशी मागणी आमदार सोळंके यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
यासंदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आयुक्तांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis