
जळगाव, 05 ऑगस्ट (हिं.स.) | अमळनेर तालुक्यातील ढेकू-आटाळे मार्गावरील फरशी पुलावर बेदरकारपणे चालविण्यात आलेली पॅजो रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सहा मजूर गंभीर जखमी झाले. जिजाबाई रोहिदास पाटील असं अपघातातील मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक रोहिदास सोनवणे (रा. ढेकू अंबासन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चालक मनोहर दिलीप चौधरी (रा. पिंपळे) हा त्याच्या पॅजो रिक्षाने मजुरांना घेऊन पिंपळे येथून परतत होता. या रिक्षात जिजाबाई पाटील यांच्यासह निर्मलाबाई एकनाथ भिल्ल, रजूबाई हिरामण भिल्ल, कलमबाई दिलीप पवार, ज्ञानेश्वर परशुराम भिल्ल, प्रमिलाबाई अजय जाधव व लताबाई पुंजू भिल्ल (सर्व रा. ढेकू) हे मजुरीचे काम आटोपून परत येत होते.यादरम्यान, ढेकू गावाच्या आधी असलेल्या फरशी पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा जागीच पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील सर्व मजुरांना गंभीर दुखापत झाली. सर्व जखमींना तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान जिजाबाई सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर जखमी महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी दीपक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अपघातास व जिजाबाई यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मनोहर चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर