
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रेशीम कोषांच्या लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पहिल्याच लिलावात रेशीम कोषांना प्रतिकिलो ८२० रुपये असा महाराष्ट्रातील सर्वाधिक दर मिळाल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेशीम उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला स्थानिक पातळीवरच योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. राज्यातील विविध व्यापाऱ्यांच्या सहभागामुळे स्पर्धात्मक बोली लागली आणि कोषांना विक्रमी दर मिळाला.
यापूर्वी शेतकऱ्यांना रेशीम कोषांच्या विक्रीसाठी इतर जिल्ह्यांतील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, सोलापुरातच लिलावाची सुविधा उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्चात बचत होणार असून शेतकऱ्यांना वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.
पहिल्याच लिलावात मिळालेल्या राज्यातील सर्वाधिक दरामुळे सोलापूर जिल्ह्यातील रेशीम शेतीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाल्याने रेशीम उत्पादन वाढीसही याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड