
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिकेत चार स्विकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहात बुधावारी(दि. ५) विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. परभणी महापालिकेच्या ६५ सदस्यीय सभागृहासाठी मागील काही महिनापूर्वी निवडणूक झाली. त्यानंतर अनेक महिने स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर पडल्याने प्रत्येक सर्वसाधारण हा मुद्दा पुढे येत येत होता. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्वीकृत सदस्यपदासाठी घालून दिलेल्या तरतूदीनसार याबाबत संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी केलेल्या शिफारशीवरून पिठासीन अधिकारी व महापौर सय्यद इकबाल यांनी स्वीकृत सदस्यांची नांवे जाहीर केली. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबिका डहाळे, शहर विकास आघाडीकडून राहुल मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेख फहाद व काँग्रेसच्या वतीने विनोद कदम यांच्या नावाची शिफारशी करण्यात आली होती. त्यास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
या सभेस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपमहापौर गणेश देशमुख, नगरसचिव विकास रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. यावेळी निवड झालेल्या स्वीकृत सदस्यांचे महापालिकेचे महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर यांनी अभिनंदन केले.दरम्यान, स्वीकृती सदस्य पदाबाबतच्या नगरविकास विभागाच्या तरतुदीनुसार परभणी महापालिकेच्या ६५ सदस्यांमागे पाच ते सहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येऊ शकते. त्यानुसार अजून एक - दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis