अमरावतीत मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावली; श्वानदंशाच्या घटना कायम
शहरातील २५ हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :शाळकरी बालिकेवर मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केलेली मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम आता थंडावल्याचे चित्र आहे. १७
मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम बंद


शहरातील २५ हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :शाळकरी बालिकेवर मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केलेली मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम आता थंडावल्याचे चित्र आहे. १७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ४१३ मोकाट कुत्रे पकडण्यात आल्याची माहिती पशुवैद्यक विभागाने दिली असली तरी शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या २५ हजारांहून अधिक असल्याने ही कारवाई अपुरी ठरत असल्याचे दिसत आहे.

घटना घडल्यानंतर तत्काळ सक्रिय होणारी महापालिका यंत्रणा काही दिवसांनी पुन्हा सुस्तावत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात श्वानदंशाच्या घटना अद्याप सुरूच असून, मंगळवारी अंबागेट परिसरातही मोकाट कुत्र्याने एका व्यक्तीला चावा घेतल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

रुक्मिणीनगर परिसरात १६ जुलै रोजी दहा वर्षीय शाळकरी मुलीवर मोकाट कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू करत मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती.

पाच पथके तैनात, मात्र कारवाईवर प्रश्नचिन्ह

मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेने पाच वाहने आणि कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. मात्र, सध्या ही पथके नेहरू मैदान परिसरात दिवसभर विश्रांती घेत असल्याचे चित्र असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी मागितलेल्या माहितीनुसार, १७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाचही पथकांनी ४१३ मोकाट कुत्रे पकडल्याचे पशुवैद्यक विभागाने सांगितले आहे. पकडलेल्या कुत्र्यांना सुकळी कंपोस्ट डेपो आणि भानखेडा परिसरात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही कुत्र्यांना शेल्टर हाउसमध्ये ठेवण्यात आले असून, यावर प्राणी मित्रांकडून आक्षेप घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अंबागेट परिसरातील श्वानदंशाच्या घटनेनंतर महापालिकेच्या कारवाईच्या प्रभावीपणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पशुवैद्यक अधिकारी पद रिक्त

महापालिकेच्या पशुवैद्यक विभागाला पूर्णवेळ कायमस्वरूपी पशुवैद्यक अधिकाऱ्याची आवश्यकता असताना हे पद अद्याप रिक्त आहे. यापूर्वी या पदावरील अधिकारी फौजदारी प्रकरणात अडकल्यानंतर प्रशासनाने रिक्त जागेवर बीएएमएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

मात्र, या पदावर सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे विद्यमान अधिकाऱ्यांवर मर्यादा येत असून, मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासह इतर कामांवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande