
रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। : राज्यातील शिक्षकांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शिक्षणाव्यतिरिक्त प्रशासकीय कामांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिक्षकांना केवळ अध्यापनाच्या कार्यासाठीच नियुक्त ठेवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शिक्षकांकडून निवडणूक प्रक्रिया, जनगणना, विविध सर्वेक्षणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कागदपत्रांची पडताळणी, महसूल व इतर प्रशासकीय कामे करून घेतली जात आहेत. या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांचा मोठा वेळ वर्गाबाहेरील कामांमध्ये जात असून विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
नियमित अध्यापनात खंड पडत असल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही आणि शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण व्यवस्थेतील ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त कामांतून तातडीने मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ नये. शिक्षकांचा वेळ प्रशासकीय कामांऐवजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च झाला पाहिजे, असे सुनील धामणकर यांनी म्हटले आहे.
याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. तसेच लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन राज्यभरातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शिक्षकांना प्रशासकीय कामांमधून मुक्त करून त्यांना पूर्णवेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)