धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; वर्ग-दोन जमिनी वर्ग-एकमध्ये नोंदविण्याचे आवाहन
आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) : महसूल अभिलेखात भोगवटदार वर्ग-दोन म्हणून नोंद असलेल्या जमिनींची भोगवटदार वर्ग-एक म्हणून नोंदणी करून घेण्याचे आवाहन धारणीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांन
वर्ग-दोन जमिनींची वर्ग-एकमध्ये नोंदणी करा धारणी येथील तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन


आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) : महसूल अभिलेखात भोगवटदार वर्ग-दोन म्हणून नोंद असलेल्या जमिनींची भोगवटदार वर्ग-एक म्हणून नोंदणी करून घेण्याचे आवाहन धारणीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी केले आहे. शासनाच्या तरतुदीनुसार ही प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यात जमीन व्यवहारांमध्ये उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी टाळता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तहसील कार्यालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, धारणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अद्यापही महसूल अभिलेखात भोगवटदार वर्ग-दोन म्हणून नोंद आहेत. मात्र, शासनाच्या ७ जून २०१८ रोजीच्या निर्णयानुसार आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या जमिनी वर्ग-दोनमधून वर्ग-एकमध्ये नोंदविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जमिनीची खरेदी-विक्री, वारसा हक्क, कर्जप्रकरणे तसेच इतर महसुली व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ही नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नोंदणी प्रक्रियेसाठी संबंधित शेतकऱ्यांनी जमिनीचा ७/१२ उतारा, उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाचा नमुना क्रमांक चार तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, धारणी येथे संपर्क साधावा. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

धारणी तालुक्यात सन १९८० मध्ये पुनर्मोजणी झालेली असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी त्यानुसार नमुना क्रमांक चार सादर केल्यास धारणाधिकाराची पडताळणी आणि महसुली प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे तहसीलदारांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.

या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींची नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande